Ahmednagar News :पशुधनावरील ‘लम्पी’ चर्मरोग हद्दपार करण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, जिल्ह्यातील ५५२ गावातील ३ लाख जनावरांना यशस्वीपणे लसीकरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात ४७८ जनावरे बाधित आहेत. त्यापैकी २१७ जनावरे बरी झालेली आहेत. शासन शेतकरी व पशुपालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
पशुंचा लम्पी रोगाने मृत्यु झाल्यास पशुपालकांना जिल्हा नियोजन निधीमधून नुकसान भरपाई देखील देण्यात येणार आहे. ‘लम्पी’ चर्म रोग हा पशुंमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो तत्पर उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो.
या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले केले आहे. जिल्हाधिकारी म्हणाले की,
जिल्ह्यात यापूर्वीही २०२०-२१ मध्ये 32 गावांमध्ये व २०२१-२२ मध्ये २७ गावात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला होता. मात्र यामध्ये एकाही पशुधनाचा मृत्यु झाला नव्हता.
त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. पशुपालकांनी त्यांच्या बाधित पशुधनासाठी मोफत उपचार घ्यावेत. खासगी वा शासकीय पशुवैद्यकांनी या साथीच्या उपचारासाठी शुल्क आकारणी केल्यास किंवा याबाबत काही तक्रार असल्यास,
विभागाच्या जिल्हा उपआयुक्त किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र. १८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.१९६२ येथे तात्काळ संपर्क साधावा.
‘लम्पी’रोगाने पशुचा मृत्यु झाल्यास पशुधनाच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अशी माहिती ही जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी यावेळी दिली.