अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना मास्क, मुखवटा, विदूषकाची टोपी, फुगे, खाऊ आणि छान छान गोष्टीचे पुस्तक देऊन त्यांचे गोपाळवाडी (ता. राहुरी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतर्फे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी मिळालेल्या या भेटी मुळे मुलांना आनंद झाला.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची सुरवात मंगळवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित तरी मोठ्या उत्साहात आणि आनंदात झाली. गोपाळवाडी (ता. राहुरी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मंगळवारी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवेशपात्र सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश त्यांच्या घरी जाऊन करून घेण्यात आले.
कोरोनाच्या प्रभावात अजून शाळा विद्यार्थ्यांसाठी उघडल्या नसल्या तरी नवीन शैक्षणिक वर्ष आणि शाळा प्रवेशाचा उत्साह मात्र कमी नाही. नवागत विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, त्यांना शाळा आपलीशी वाटावी यासाठी दरवर्षी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते.
यंदाही ती परंपरा चालू ठेवतांना पण त्याच वेळी कोरोना काळातील प्रतिबंधात्मक उपयांचे पालन करत अर्थात शारीरिक अंतर ठेवत , मास्क आणि सॅनिटायजर वापरत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन प्रवेश करून घेण्यात आला. सुरक्षित राहून , योग्य काळजी घेऊन आपल्याला शाळा बंद असली तरी शिक्षण सुरू ठेवायचे आहे.
पालकांनी ही आपल्या पाल्याच्या अभ्यासाबाबत सजग असायला हवे आणि काळजी घ्यायला हवी, असे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत म्हणाले. विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाच्या या सोहळयाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश जाधव,
बाबासाहेब जाधव, सीताराम जाधव, ज्ञानदेव अण्णा जाधव, पाटीलबा जाधव, मोहन जाधव यांनी परिश्रम घेतले. शाळा, नवीन गणवेश, पुस्तके, दप्तर यासह शाळेत येण्याचा मुलांचा उत्साह दांडगा असला तरी अजून परिस्थिती कठीण असल्याने घरूनच,
भौगोलिक गटात, शिक्षक मित्रांच्या मदतीने आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण अभ्यास करायचा आहे, असे शिक्षक नारायण मंगलारम यांनी सांगितले.