अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त असूनही अहमदनगरसह काही जिल्ह्यांत लशीचा पुरवठा कमी होत आहे. सुरवातीच्या काळात अनेक जिल्ह्यांत नागरिक लस घेण्यासाठी पुढे आले नाहीत.
गैरसमज किंवा अन्य कारणांमुळे त्यावेळी लस शिल्लक राहण्याचे, मुदत संपल्याने वाया जाण्याचे प्रमाण जास्त होते. तेव्हापासून या जिल्ह्यांत लसींचा पुरवठा कमी करण्यात आला.
तीच पद्धत अद्याप सुरू राहिली,’ असे कारण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. राज्याने लसीकरणात विविध विक्रम केल्याचे सांगितले जात असले तरी अनेक जिल्ह्यांत लसीकरणाचे प्रमाण कमी आहे.
लोकांना लस मिळविण्यासाठी चकरा माराव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी गोंधळ आणि गैरप्रकारही होत आहेत. आता निर्बंध शिथील करताना अनेक ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे.
त्यामुळे लस घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे करोना बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. यासंबंधी पत्रकारांनी विचारले असता मुश्रीफ म्हणाले, हे खरे आहे की, ‘अनेक जिल्ह्यांत लस कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातही आतापर्यंत अवघे २६ टक्के लसीकरण झाले आहे. रुग्ण संख्या आणि लोकसंख्या विचारात घेऊन लस पुरवठा व्हावा, यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करीत आहोत.
मात्र, पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन लस पुरवठ्याचे प्रमाण ठरविण्यात आले आहे. ज्या भागात सुरवातीच्या दोन-तीन महिन्यांत लसीकरणाचे प्रमाण चांगले होते, तेथे आजही चांगला पुरवठा होत आहे.’असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.