अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- नेवासे तालुक्यात खतांची तीव्र टंचाई असताना मंत्री मात्र मूग गिळून गप्प बसल्याची टीका माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली.
मागील आठवड्यात मंत्र्यांनी कृषिमंत्र्यांना भेटून युरिया खताची मागणी करणारे पत्र दिले. त्यानुसार तालुक्याला युरिया मिळायला हवा होता.
मंत्र्यांनी त्यांच्या स्वत:च्या सोनई सोसायटीसाठी युरिया घेतला व तालुक्याला वाऱ्यावर सोडले. खतांचे भाव वाढलेले नाहीत, कोणीही जास्त दराने खत विक्री करू नये, असे विधान त्यांनी उगीचच केल्याने शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला, असे मुरकुटे म्हणाले.
बाजारात युरियाचा तुटवडा भासत आहे. युरियाचा संरक्षित साठा गोदामांत उपलब्ध नाही. पर्यायी व्यवस्था होताना दिसत नाही.
बफर स्टॉक मार्च, एप्रिलमध्येच करायचा असतो, परंतु कृषी विभागाच्या नियोजनाअभावी तो न झाल्यामुळे आज जो काय माल येत आहे तो बफर स्टॉककडे वळवला जात आहे.