मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहे. शिवसेनेच्या (Shivsena) काही आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाऊन बंडखोरी केली. तसेच आता याच आमदारांच्या (MLA’s) गटाने भाजप सोबत जात राज्यात सरकार स्थापन केले आहे. तर एकीकडॆ शिंदे गटाचे आमदार शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर आरोप करत आहेत.
शिंदे गटाचे (Shinde group) आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका करत गंभीर आरोप देखील केले आहेत. भारत गोगावले म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बराचसा अवधी दिला होता.
अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ गेलेली नाही असं ते सांगत होते पण इकडे आमच्या एक एका लोकांची पदं काढली जात होती. या सगळ्या अनुषंगाने आणि संजय राऊतांचं जे वक्तव्य येत होतं हे काळजाला घरं पाडणारं होतं, लोकांना चिड आणणारं होतं.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मिलिंद नार्वेकरांना आमच्याशी चर्चा करण्यासाठी सूरतला पाठवत आहेत आणि इकडे हे आमची पदं काढत आहेत, संजय राऊत तोंडाला येईल ते बोलत आहेत, म्हणून आमचं एक एक पाऊल पुढे पडत गेलं.
नाहीतर आम्ही त्या स्थितीत होतो. आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि निर्णय घ्यायला लावला. त्यांनीही सांगितलं की तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडा. वरची लोकं आपल्यासोबत यायला तयार आहे.
परंतु ते आमचं काहीही ऐकून न घेता फक्त वन मॅन शो संजय राऊत. त्यांना वाटलं मागच्यावेळी ज्या घडामोडी झाल्या तशा यावेळेला होतील. पण तसं नव्हतं.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर पाईक आहोत. मोडेन पण वाकणार नाही म्हणून आम्ही पुढे जात होतो. संजय राऊतांनी नेमकी कुणाची सुपारी घेतली होती ते आम्हाला काही कळलं नाही.
गेले अनेक दिवस तुम्ही पाहताय की संजय राऊत काय बोलत आहेत आणि त्याचे परिणाम काय होत आहेत. तुम्हाला आमच्यापेक्षा जास्ती माहिती आहे.
कारण आम्ही गुवाहाटीला होतो. पण संजय राठोड जे म्हणत आहेत ते खरं आहे. आमचे चाळीस जण आणि अपक्ष मिळून 50 हेच सांगत आलेत, असंही गोगावले म्हणाले आहेत.
पुढे बोलताना गोगावले म्हणाले, आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचं ब्रिद वाक्य घेऊन जात आहोत. बाळासाहेब, दिघे साहेबांना दैवत मानत पुढे जात आहोत. आम्ही शिवसेना सोडली नाही, सोडणार नाही असं स्वत: मुख्यमंत्री सांगत आहेत.
यापेक्षा वेगळा दाखला काय हवाय? ग्रामीण भागात किंवा शहरात विभागप्रमुख, जिल्हा प्रमुख असे सगळे आमच्या संपर्कात आहेत. पण 12 खासदार शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत की नाही याची मला काही कल्पना नाही.
परंतु शेवाळेसाहेबांनी काल आणि आज जे काही वक्तव्य केलं त्याचा अर्थ काय याची कल्पना त्यांना यायला हवी, असं वक्तव्यही भरत गोगावले यांनी केले आहे.
भरत गोगावले आमदारांना बजावलेल्या नोटीस बाबतही वक्तव्य केले आहे. ते म्हणले, 11 तारखेला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. बहुमत आमच्याबाजूने आहे. आता वस्तुस्थिती आणि परिस्थिती काय आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं.
आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही केलंय. आम्ही अजूनही काही गोष्टी विसरलो नाही. शिंदे साहेबांनी सांगितलं की आदित्य ठाकरे यांना बाजूला ठेवून आपण 14 जणांना नोटीस बजावावी त्याप्रमाणे आम्ही ती बजावली हेही ते म्हणाले आहेत.