अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- हुंड्याच्या लालसेने विवाहितांची छळवणूक आणि त्यांच्या आत्महत्या,खून या घटना संगमनेर तालुक्यात नित्याच्याच झाल्या आहेत. नुकतीच एका २३ वर्षीय विवाहितेने आपली जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी पती,सासू ,मावस सासू व तिचा जावाई अशा चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, पितृछत्र हरपलेल्या नुरेन तरुणीचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. मात्र सासरच्या मंडळींनी सुरुवातीला फर्निचर आणि नंतर कार घेण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरु केला. मात्र सासरच्या मंडळींची लालसा पूर्ण करण्यास तिची आई असमर्थ असल्याने अखेर तिने सोमवारी गळफास घेत आत्महत्या केली.
या प्रकरणी मयत विवाहितेच्या आईने शहर पोलीस ठाण्यात गेल्या दोन वर्षात नुरेनचा तिच्या सासरच्या मंडळींनी केलेला छळ, त्यातून वारंवार तिला झालेली मारहाण यामुळेच आपल्या मुलीने आत्महत्या केली असल्याचे सांगत मयत नुरेनची आई अलमास सय्यद यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत वरीलप्रमाणे फिर्याद दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी रियाज नवाब इनामदार (नवरा), राशद नवाब इनामदार (सासू), मुमताज पठाण (मावस सासू, रा.समशेरपूर) व इब्राहिम उर्फ बालम शेख (जावई, रा. मालदाड रोड) यांच्यावर नुरेन इनामदार हिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्या प्रकरणी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यात विवाहितांच्या आत्महत्येची एकामागून एक प्रकरणे समोर आली आहेत. आजच्या आधुनिक युगातही हुंड्यासाठी निष्पाप मुलींचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याने समाजातील काही घटकांची मानसिकता झिंग आणणारी ठरत आहे.
मयत नुरेन इनामदार ही बारावीपर्यंत विज्ञान शाखेतून शिकलेली सुस्वभावी मुलगी होती. वडिलांच्या निधनानंतरही तिने आपल्या आईसोबत राहून जिद्दीने नियतीचा सामना केला, मात्र सासरच्या छळापुढे तिला झुकावं लागलं आणि एका हुशार मुलीचा असा अंत झाला.
तिच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांना तत्काळ अटक करावी अशी संतप्त प्रतिक्रीया आता समाजातून समोर येत आहे.