अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे ? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाहीये का ? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले ?
असा सवाल करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संतापले. मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे. मंदिर बचाव कृती समितेने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे धोरण बरोबर नाहीये.
१० दिवसात जर मंदिर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर मोठे जेल भोरो आंदोलन करा मी तुमच्या बरोबर राहील, असा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला. नगरच्या मंदिर बचाव कृती समितीने जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेवून राज्यातील बंद असलेली सर्व मंदिरे उघडण्या साठी सरकार कडे पाठपुरावा करावा असे साकडे घातले.
अण्णा हजारे पुढे म्हणाले, भरकटत चालेल्या समाजाला फक्त मंदिरेच तारू शकतात यावर माझा विश्वास आहे. मी आज जे काही आहे ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच आहे. आज ८४ वय झाले आहे. मात्र माझ्यावर एवढासाही कोणताच डाग नाहीये.
हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचा परिणाम आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या समाधी जवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालोय. संतांचे विचार देणारे मंदिरे का बंद केली. सरकारला संतांचे विचार काय समजले ? त्यामुळे सरकाने आपले धोरण बदलावे व त्वरित मंदिरे उघडावीत.