Parner Vidhansabha Nivadnuk : भारतीय निवडणूक आयोग लवकरच विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच दौरा केला होता. या दौऱ्यात निवडणूक आयोगाने नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रात निवडणूक होणार असे स्पष्ट केले आहे.
अशा या परिस्थितीत सध्या महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही गटांमध्ये सध्या जागावाटपावर जोरदार चर्चा सुरू आहे. अजून या दोन्ही गटात जागा वाटपावर अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र लवकरच या दोन्ही गटाचे जागावाटप फायनल होईल असे चित्र दिसते.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक ऑक्टोबरला महाविकास आघाडीची उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार अशी माहिती नुकत्याच काही दिवसांपूर्वी दिली होती. दरम्यान आज जयंत पाटील यांनी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत नुकतेच एक मोठे भाष्य केले आहे.
खरे तर या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गट दोन्ही इच्छुक आहेत. पण, जयंत पाटील यांनी या जागेचा उमेदवार खासदार निलेश लंके हे ठरवतील असे म्हटले आहे. यामुळे मात्र शरद पवार गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद पेटण्याची शक्यता निर्माण होत आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काढलेली शिवस्वराज्य यात्रा आज निघोज मध्ये आली होती. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत केलेल्या विधानाची सध्या संपूर्ण नगर मध्ये चर्चा सुरू आहे.
जयंत पाटील म्हणतात….
निघोज येथील शिवस्वराज्य यात्रेदरम्यान जयंत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पारनेर-नगर मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची ते आम्ही खासदार लंकेंवर सोडलं असल्याचे स्पष्ट केले आहे.
ते म्हणालेत की, तुम्ही सर्वानुमते ठरवा कोणाला उमेदवारी द्यायची ? खासदार लंके यांनी नाव घ्यावे. नुसते नाव नव्हे, तर ते उखाण्यात घ्यावे. शरद पवारांपुढे त्यांनी उखाण्यात नाव घेतल्यावर मी त्यांच्या ‘एबी’ फॉर्मवर लगेच सही करेल, असं म्हणत जयंत पाटील यांनी पारनेरचा महाविकास आघाडीचा उमेदवार खासदार निलेश लंके हेच ठरवतील असे जाहीर केले आहे.
जयंत पाटील यांच्या या विधानामुळे या जागेवर शरद पवार गटाकडून निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशा चर्चांनी जोर पकडला आहे. मात्र शरद पवार गटाच्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांचा गट नाराज होण्याची शक्यता आहे.
शरद पवार गटाच्या या भूमिकेमुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उबाठा शिवसेना पक्षात वाद होण्याची शक्यता देखील तयार होत आहे. दुसरीकडे खासदार लंके यांनी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार तब्बल एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.