Pakistan Petrol rate :रोखीच्या समस्येला तोंड देत असलेल्या पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा इंधनाच्या दरात (Fuel Price Hike) मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने पेट्रोलवर 10 रुपये प्रति लिटर आणि हाय-स्पीड डिझेल (HSD),
रॉकेल आणि लाइट डिझेल तेल (LDO) वर प्रति लिटर 5 रुपये पेट्रोलियम शुल्क लागू केले आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढले आहेत. यासोबतच पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे.
पाकिस्तान सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोलची किंमत 14.85 रुपयांनी वाढून 248.74 रुपये प्रति लिटर झाली आहे. हायस्पीड डिझेलच्या दरात 13.23 रुपयांनी आणि रॉकेलच्या दरात 18.83 रुपयांची वाढ झाली आहे. आता पाकिस्तानमध्ये हायस्पीड डिझेल 276.54 रुपये प्रति लिटर झाले आहे. केरोसीन तेल 230.26 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.
सरकारची वाईट अवस्था
पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ता इस्माईल यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हटले होते की सरकार आता अधिक सबसिडी सहन करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे वाढ करण्याची गरज आहे.
बेलआउट पॅकेज मिळवण्याचा प्रयत्न करत आहे
यावर्षी एप्रिलमध्ये सत्तेवर आलेल्या शाहबाज शरीफ सरकारच्या कार्यकाळात चौथ्यांदा इंधन दरात वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या 6 अब्ज डॉलरचे रखडलेले बेलआउट पॅकेज पुन्हा सुरू करण्याच्या सूचनेनुसार पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.
आयएमएफने बेलआउट कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी पेट्रोलियम उत्पादनांवर शुल्क आकारण्यासारख्या कठोर अटी घातल्या होत्या. येत्या काही दिवसांत पाकिस्तानमध्येही विजेचे दर वाढू शकतात, कारण IMF ने वीज दर वाढवण्याची अट घातली आहे.
जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत
पाकिस्तानमध्ये सतत गरजेच्या वस्तू महाग होत आहेत. गेल्या महिन्यात, पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी दावा केला होता की ते किमती स्थिर राहतील याची खात्री करतील. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर महागाईचा आरोप केला होता. देशाला दिवाळखोरीपासून वाचवायचे असेल तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवाव्या लागतील, असे ते म्हणाले होते.