अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी बरोबर असलेल्या काही लोकांमुळे आमचा पराभव झाला. आ रोहित पवार यांना निशाणा करण्यासाठी तसेच त्यांना धडा शिकविण्यासाठी त्याच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी आमच्या खांद्यावर बंदूक हा खेळ केला आहे.
मात्र त्यांच्या या जिरवाजिरवीत आमच्या सारख्या सर्वसामान्याचा बळी गेला आहे. या पराभवाचे आ.रोहित पवार यांच्यासह सर्वांनाच आत्मपरिक्षण करावे लागणार आहे.
असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके व मिनाक्षीताई साळुंके यांनी व्यक्त केले. जिल्हा बँकेच्या कर्जत तालुका सोसायटी मतदारसंघातून अंबादास पिसाळ एक मताने विजयी झाले.
कर्जत सोसायटी मतदार संघाची लढत मीनाक्षीताई साळुंके व अंबादास पिसाळ या दोन्ही विद्यमान संचालकामध्ये झाली. कर्जत सोसायटी मतदार संघाच्या ७४ मतदारांपैकी ७३ जणांनी मतदान केले होते.
मतमोजणीमध्ये अंबादास पिसाळ अवघ्या एक मताने विजयी झालेले आहेत. यामध्ये साळंके यांना ३६ तर पिसाळ यांना ३७ मते मिळाली. सुरूवातीला या निवडणुकीत मिनाक्षीताई साळुंके यांचे पारडे जड होते.
त्यांनी ४० सदस्य सहलीवर नेले होते, तर त्यांना मतदान करतील असे काही सदस्य कर्जत मध्येच होते. या सर्वांची बेरीज ४५ पर्यत जाईल असे बोलले जात होते.
मात्र प्रत्यक्षात साळुंके यांना अवघी ३६ मते मिळाल्याने महाविकास आघाडीला या पराभवाच्या नामुष्किला सामोरे जावे लागले. अपेक्षित ९ मते बरोबर राहून कोणती फुटली याचा शोध घ्यावा लागणार आहे.
या निवडणुकीत साळुंके यांच्या बाजूने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ.रोहित पवार, व तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनी आपली ताकद उभी करून ही त्याचा उपयोग झाला नाही.
भाजपाकडून पिसाळ यांच्या विजयासाठी माजी मंत्री राधाकृष्ण विखे, खा.सुजय विखे, माजीमंत्री प्रा.राम शिंदे व तालुक्यातील नेत्यांनी विशेष प्रयत्न केले.
या निवडणुकीतुन अंबादास पिसाळ यांनी आपण पक्के खिलाडी असल्याचे संकेत देत सध्याच्या नव्या पर्वात विखेंंबरोबर योग्य मार्गावर असल्याचे सर्वांनाच दाखवून दिले.