अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-सध्या शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रोज मोठ्या संख्येने वाढणाऱ्या रुग्ण संख्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी प्रत्येकाने नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. याच बरोबर कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे देखील गरजेचे आहे.
यासाठी शासनाच्या वतीने कालपासून १८ ते ४४ वर्षापर्यतच्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
त्यानुसार अहमदनगर महानगरपालिकेला सुमारे १० हजार लसीकरणासाठी डोस पुरवठा झाला आहे.
मात्र नगरसाठी हे डोस अपुरे असून जास्तीत जास्त लसीकरणाचे डोस प्राप्त करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून लस उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने १८ वर्ष ते ४४ वर्षा पर्यंतच्या वयोगटातील नागरिकांना जिजामाता आरोग्य केंद्रात लसीकरणाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. उपायुक्त यशवंत डांगे, तसेच डॉक्टर, नर्स आरोग्य कर्मचारी उपस्थित होते