अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या राज्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील तापमान आता दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक जिल्ह्यातही काहीशी अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन (Pomegranate Production) घेतले जाते यामुळे सध्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना (Pomegranate growers) उन्हापासून आपली डाळिंब बाग (Pomegranate Orchards) सुरक्षित करण्यासाठी अक्षरशा नाकीनऊ येत आहेत.
यामुळे आता डाळिंब उत्पादक शेतकरी नामी शक्कल लढवीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील (Malegaon) दाभाडी, सातमाने तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी बांधवानी डाळिंबाच्या बागाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डाळिंबाच्या झाडांना जुन्या साड्या नेसवल्या आहेत.
यामुळे डाळिंबाच्या झाडांना सावलीची उत्तम व्यवस्था झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी घरातील जुन्या साड्या वापरल्या जात असून या सुरक्षेसाठी अतिशय अत्यल्प खर्च शेतकऱ्यांना उचलावा लागत आहे.
यामुळे साड्यांनी नटलेल्या डाळिंबाच्या बागा आता परिसरात चर्चेचा विषय ठरत आहेत. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या या अफलातून जुगाडाचे कौतुकच केले आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, डाळिंबाच्या शेतीसाठी कसमादे पट्ट्याचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते.
मात्र आता या डाळिंबाच्या आगारातून डाळिंबाच्या बागा हळूहळू कमी होऊ लागल्या आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे तेल्या समवेतच डाळिंब बागांवर अनेक रोगांचे सावट आता दिवसेंदिवस दाट होत आहे.
यामुळे शेतकरी बांधवांना डाळिंबाच्या बागा जोपासणे आता मोठे जिकिरीचे होऊन बसले आहे. असे असले तरी परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकरी अजूनही मोठ्या कष्टाने आणि वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपाययोजना करीत डाळिंबाच्या बागा जोपासत आहेत आणि चांगले उत्पादन देखील मिळवीत आहेत.
सध्या मात्र, कसमादे पट्ट्यात विशेषता मालेगाव व आजूबाजूच्या परिसरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. सध्या या परिसरात तापमान 40 डिग्री सेल्शिअस पार गेले आहे.
यामुळे आंबे बहार हंगामात पकडल्या जाणाऱ्या डाळिंब बागा जोपासण्यासाठी शेतकऱ्यांची शर्तीची पराकाष्ठा सुरू आहे. मालेगाव तालुक्यातील मौजे दाभाडी येथील नवयुवक डाळिंब उत्पादक शेतकरी सुरेश यशवंत निकम यांनी वाढत्या तापमानापासून डाळिंबाच्या बागा वाचविण्यासाठी एक नामी शक्कल लढवली आणि जुन्या साड्यांनी डाळिंबाची बाग आच्छादित केली आहे.
यामुळे उन्हापासून डाळिंबाच्या बागा सुरक्षित ठेवण्यास मदत होत असल्याचा सुरेश यांनी दावा केला आहे. या साठी सुरेश यांनी मालेगावहुन जुन्या साड्यांची खरेदी केली आहे.
प्रति नग वीस रुपये दराने सुरेश यांनी जुनी साडी विकत आणून डाळिंबाला आच्छादन घातले आहे. अगदी तळहाताच्या फोडा प्रमाणे सुरेश आंबिया बहरात बहरलेले डाळिंबाचे फळ सध्या जोपासत आहेत.
फळांवर धूपचट्टे पडू नये यासाठी अनेक शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करतात तरीदेखील यावर अनेकदा नियंत्रण मिळविण्यात यश येत नाही.
यामुळे सुरेश यांनी नामी शक्कल लढवत धूपचट्टे पडण्या अगोदरच उन्हापासून डाळिंबाच्या बागा संरक्षित करण्याचा निर्धार घेतला आणि ही अत्यल्प खर्चात करता येणारी उपायोजना अमलात आणली.
वादळी वाऱ्यांमुळे साड्या डाळिंबाच्या झाडांवरून उडून जाऊ नये यासाठीदेखील उपाय योजना केली आहे. यासाठी सुरेश यांनी साडीच्या चार कोपऱ्याला दगड गोटे बांधले आहेत.
सुरेशप्रमाणेच कसमादे पट्ट्यातील अनेक डाळिंब उत्पादक शेतकरी आपल्या डाळिंबाच्या बागांना जुन्या साड्यांचे आच्छादन करण्यास सध्या व्यस्त आहेत.