Ahmednagar News :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात ९३ सहायक पोलिस आयुक्त; तसेच पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्या वादग्रस्त झाल्याचा आरोप होत होता. आता त्या अधिकाऱ्यांच्या मुदतीपूर्वीच बदल्या होणार आहेत.
पोलिस महासंचालक कार्यालयाकडून यासंबंधीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील चार पोलिस उपअधीक्षकांचा समावेश आहे. त्यांना बदलीसाठी तीन पसंतीची ठिकाणे कळविण्यास सांगण्यात आले आहे.
श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, कर्जतचे अण्णासाहेब जाधव, कोपरगावचे संजय सातव व संगमनेरचे राहुल मदने या नगर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांचा या ९३ जणांच्या यादीत समावेश आहे. २०२० मध्ये या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या.
नियमानुसार त्यांची मुदत पूर्ण होण्याआधीच बदलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बदलीसाठी पात्र नसतानाही मुदतपूर्व बदली झाल्यास महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) दाद मागितली जाण्याची शक्यता आहे.
वर्षभरापूर्वी राज्यातील पोलिस बदल्यांचे प्रकरण देशभर गाजले होते. माजी गृहमंत्री देशमुख यांना बदली प्रकरणावरून विरोधकांनी लक्ष्य केले असून, त्यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून बदल्यांच्या कथित रॅकेटसंदर्भात चौकशी सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्या कार्यकाळातील ९३ सहायक पोलिस आयुक्त; तसेच पोलिस उपअधीक्षकांच्या झालेल्या बदल्यांबाबत पोलिस महासंचालकांकडून शंकेची सुई उपस्थित करण्यात आल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू झाली आहे.