संजय राठोड यांच्यासमोरील अडचणींमध्ये पुन्हा वाढ, तब्बल दहा हजार जणांविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेनंतर मागील दोन आठवड्यांपासून अज्ञातवासात असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी २३ फेब्रुवारी रोजी पोहरागडावर शक्तिप्रदर्शन करत आपली भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली असताना, हजारोंच्या संख्येने जमाव एकत्र आल्याने पोलीस प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारला आहे.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रल्हाद शेषराव चव्हाण यांच्या तक्रारीवरून प्रमुख दहा व्यक्तींसह सुमारे दहा हजारांवर व्यक्तींविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने विनोद रा. राठोड, अमित हिरा चव्हाण, राज रामराव राठोड, धीरज विजय राठोड, अर्जुन भिका राठोड, रमेश तुकाराम राठोड, केशव राठोड, आकाश पंडित राठोड,

सुधीर अंबादास राठोड, अमित देवेंद्र राठोड यांच्यासह आठ ते दहा हजार व्यक्तींविरोधात साथरोग अधिनियम १८५७ चे कलम २,३ व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मानोरा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीत झालेल्या गर्दीबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार मानोरा पोलिसांनी तब्बल दहा हजार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे वनमंत्री संजय राठोड यांच्यासमोरील अडचणींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts