जामखेड तालुक्यातील खर्डा येथील २० मदारी कुटुंबासाठी २०१६ मध्ये मंजूर झालेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची अंमलबजावणी त्वरित करावी या मागणीसाठी मंगळवार ३ जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘घर देता का घर’ हे अनोखे धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या भटके विमुक्त समन्वय समितीचे राज्य सह समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने राज्यातील भटके विमुक्त प्रवर्गातील विविध जाती जमातीच्या कुटुंबांसाठी राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा येथील आठवडे बाजाराच्या ओट्यावर गेल्या १०० वर्षांपासून तात्पुरते पाल ठोकून राहणाऱ्या मदारी समाजातील २० कुटुंबांसाठी २०१६ मध्ये सदर योजना मंजूर झालेली आहे.
व सदर योजनेसाठी आवश्यक असलेला निधी देखील संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. मदारी वसाहत बांधण्यासाठी खर्डा येथील गावठाणा मध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु सदरच्या जागेवरून उच्च दाबाच्या वीज वाहक तारा गेल्या असल्यामुळे मनुष्य वस्तीच्या सुरक्षेच्या कारणावरून सदरची जागा रद्द करण्यात आली.
व दुसरी जागा उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्यक्षात जागा व निधी उपलब्ध होऊन सहा वर्षे उलटले तरी सदर योजनेची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे गेल्या ६ वर्षापासून या योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या २० मदारी कुटुंबाने गेल्या ६ वर्षात वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तहसील कार्यालय, जामखेड पंचायत समिती कार्यालय, आमदार रोहित पवार यांचे कार्यालय तसेच खर्डा चौक येथे आंदोलने केली.
परंतु आंदोलनानंतर प्रशासनाकडून केवळ पोकळ आश्वासने देण्यात आली व आंदोलन थांबविण्यास भाग पाडले. मदारी समाजाच्या गंभीर प्रश्नांकडे सोईस्करपणे डोळे झाक केली जात आहे. त्यामुळे समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘घर देता का घर’ हे अनोखे आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
याबाबत जिल्हाधिकार्याकडून ठोस कार्यवाही झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाहीत, अशी माहिती लोक अधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, महिला जिल्हाध्यक्ष द्वारका पवार, तालुकाध्यक्ष विशाल पवार, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, सचिव योगेश साठे, तालुकाध्यक्ष आतिष पारवे, शहराध्यक्ष आजिनाथ शिंदे, जिल्हा संघटक भिमराव चव्हाण, भीमराव सुरवसे,
लाला वाळके, सागर ससाने, कल्याण आव्हाड, स्मिता मोहिते, रेश्मा बागवान, हुसेन मदारी, फकीर मदारी, सरदार मदारी, सलीम मदारी, मुस्तफा मदारी, बाळासाहेब सदाफुले,संतोष भोसले,तुकाराम पवार,नरशिंग भोसले,सचिन भिंगारदिवे,संतोष चव्हाण,गणपत कराळे, यांनी केले आहे.