चारा छावण्यांचे थकीत अनुदान तातडीने द्या : राजळे

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- जिल्ह्यात राज्य सरकार मार्फत सन २०१८-१९ मध्ये दुष्काळात जनावरांच्या शासन अनुदानित चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या.

त्यातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील ५२ चारा छावण्यांचे सप्टेंबर २०१९ महिन्यातील ४ कोटी २१ लाख रुपये अनुदान थकीत आहे. ते तातडीने देण्यात यावेत, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निवेद्वानाद्वारे केली आहे.

आमदार राजळे यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी भागात जनावरांसाठी राज्य सरकारने स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनुदानीत चारा छावण्या सुरु केल्या होत्या.

चारा छावण्यांचे सप्टेंबर, ऑक्टोबर २०१९ या दोन महिन्याच्या कालावधीतील नगर जिल्ह्यातील १३ कोटी २९ लाख ९३ हजार २०३ रुपये अनुदान देणे बाकी आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील शेवगाव तालुक्यातील २३ चारा छावण्यांचे २ कोटी ११ लाख व पाथर्डी तालुक्यातील २९ चारा छावण्यांचे २ कोटी १० लाख अनुदान मिळणे बाकी आहे.

या छावणी चालकांनी वरील कालावधीतील थकीत अनुदान वारंवार मागणी करुनही अद्याप मिळाले नसल्याने छावणी चालक संकटात सापडलेले आहेत. काही चारा छावणी चालकांनी लाखो रुपये उसनवार घेऊन तसेच उधारीवर चारा खरेदी, पशुखाद्य व इतर साहित्य घेतलेले आहे.

मात्र शासन अनुदान न मिळाल्याने उधारी देणे बाकी असल्याने छावणी चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. चारा छावण्यांचे थकीत अनुदान मिळण्यासाठी यापूर्वी नगरचे जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडे वेळोवेळी मागणी करुन पाठपुरावा केलेला आहे.

मात्र अद्याप अनुदान मिळणे बाकी आहे. या प्रश्नात लक्ष घालून चारा छावण्यांचे राहिलेले अनुदान तातडीने मिळावे, यासाठी कार्यवाही करावी, व छावणी चालकांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार राजळे यांनी संबधीत मंत्र्यांकडे केली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts