Maharashtra news : केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी यावरून पेट्रोल पंप चालक-मालक मात्र भडकले आहेत.
ही दरकपात चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने पंपचालकांचा मोठा तोटा होणार असल्याचा संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे ३१ मे रोजी खरेदी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी इंधन तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
केंद्र व राज्याने केलेल्या चुकीच्या करकपातीमुळे पंपचालकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा फामपेडा संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी केला आहे. आधीच २०१७ पासून कमिशनमध्ये वाढ केलेली नाही.
आता अचानक कर कपात केली. त्यामुळे पंप चालक-मालकांमध्ये नाराजी आहे. याच्या निषेधार्थ ३१ मे रोजी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाची खरेदी केली जाणार नाही. शिल्लक साठा असेपर्यंतच यादिवशी इंधनाची विक्री केली जाईल. अचानक केलेल्या कर कपातीमुळे पेट्रोल पंप चालकांचे मोठे नुकसान झाले आहे.