Maharashtra news : पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनाला पहिला पाठिंबा भारतीय जनता पक्षाकडून मिळाला आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ही घोषणा केली आहे.
पुणतांब्यात शेतकऱ्यांनी १ जूनपासून धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही ग्रामस्थांनी केले आहे. त्यावर भाजपकडून पहिला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. विखे पाटील म्हणाले, ‘या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा राहणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकऱ्यांना अपेक्षा राहिलेली नाही. त्यामुळे वीज, पाणी या प्रश्नावर आम्ही संघर्ष करत आहोत. राज्यात मोठ्या प्रमाणात उसाची तोडणी झालेली नाही.
त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांच्या इतरही प्रलंबित मागण्यांसाठी पुणतांबे येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आम्ही या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहोत,’ असेही विखे पाटील म्हणाले.