Pune-Nashik Expressway : पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील दोन महत्त्वाची शहरे आहेत. ही दोन्ही शहर महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. यामुळे या शहरांमधील रस्ते, कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
खरे तर राज्यातील शहरा शहरांमधील अंतर कमी व्हावे यासाठी महामार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. यापैकीच एक महामार्ग म्हणजे पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या महामार्ग प्रकल्पासाठी सरकारने 8000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
पण या महामार्ग प्रकल्पाचे काम रखडणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. खरंतर, राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित केला आहे. हा महामार्ग 805 किलोमीटर लांबीचा राहणार असून राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे.
मात्र या महामार्ग प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाचा कडाडून विरोध केला जात आहे. यामुळे या महामार्ग प्रकल्पासाठी सुरू करण्यात आलेले भूसंपादन थांबवण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतलाय.
विशेष म्हणजे सरकारकडून आता शक्तीपीठ महामार्गाच्या संरेखणात बदल होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मोठा विरोध होत असल्याने या प्रकल्पातून कोल्हापूर जिल्हा वगळला जाईल अशी घोषणा केली आहे.
तथापि शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा महामार्ग प्रकल्प थेट रद्दच केला पाहिजे अशी मागणी केली जात असून यासाठी अजूनही आंदोलन सुरूच आहे. दरम्यान आता शक्तिपीठ महामार्गानंतर पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्गाला देखील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. या प्रकल्पा विरोधात 14 गावातील ग्रामस्थांनी आवाज बुलंद केला आहे.
हा महामार्ग प्रकल्प शेतकऱ्यांच्या बागायती जमिनींमधून आणि लोकवस्ती मधून जात असल्याने या प्रकल्पाला बाधित जमीन धारकांच्या माध्यमातून विरोध केला जात आहे. अशा परिस्थितीत आता आपण शेतकऱ्यांकडून विरोध होत असलेला हा महामार्ग प्रकल्प नेमका कसा आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसा आहे पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग?
पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प 213 किलोमीटर लांबीचा आहे. यासाठी जवळपास 20000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे सरकारने या प्रकल्पासाठी 8000 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देखील दिली आहे.
या महामार्गावरुन राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट शिर्डीला जाता येणार आहे. यामुळे पुण्यातील साई भक्तांना साई दर्शनासाठी जाताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही असा विश्वास व्यक्त होत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर साईभक्त जलद गतीने साईनगरी शिर्डीत पोहोचतील.
सध्या पुणे ते नाशिक हा प्रवास पूर्ण करण्यासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी लागतोय मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा प्रवासाचा कालावधी अवघ्या अडीच ते तीन तासांवर येणार आहे. परंतु या प्रकल्पाला आता स्थानिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून कडाडून विरोध होत असल्याने हा महामार्ग प्रकल्प मार्गी लागणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.