ताज्या बातम्या

पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग मोकळा, अजित पवारांनी प्रकल्पाबाबत दिली मोठी माहिती, काय म्हटलेत पवार ?

Pune Nashik Railway : पुणे, नासिक आणि मुंबई ही तीन शहरे राज्याचे सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जातात. या तीन शहरांपैकी पुणे ते नाशिक दरम्यान अजूनही थेट रेल्वे मार्ग तयार झालेला नाही.

यामुळे पुणे ते नाशिक हा प्रवास खूपच किचकट झालेला आहे. रस्ते मार्गाने या दोन शहरादरम्यान प्रवास करण्यासाठी नागरिकांना अधिकचा कालावधी खर्च करावा लागत आहे. यामुळे पुणे ते नाशिक असा थेट रेल्वे मार्ग तयार झाला पाहिजे अशी नागरिकांची इच्छा आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्राच्या मंजुरीमुळे रखडलेले आहे. त्यामुळे हा प्रकल्प केव्हा पूर्ण होणार ? असा सवाल अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, याच प्रकल्पाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठ अपडेट समोर आले आहे. या प्रकल्पाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवारांनी मोठी माहिती दिली आहे. गुरुवारी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत अजित पवारांनी या प्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.

त्यांनी हा प्रकल्प राज्य सरकारच पूर्ण करणार असे यावेळी सांगितले आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून यासाठीच्या भूसंपादनाचा मार्ग लवकरच मोकळा होणार असे संकेत त्यांनी दिले आहेत.

खरे तर हा प्रकल्प गेल्या काही महिन्यांपासून रखडला आहे. हा प्रकल्प राज्य सरकारच्या महारेलच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे ठरले होते. तसेच या प्रकल्पाच्या आराखड्याला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मान्यता देखील दिली होती. मात्र केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून या प्रकल्पाला मंजुरी मिळालेली नसल्याने या प्रकल्पाचे काम सुरू होत नव्हते.

दरम्यान हा प्रकल्प राज्य सरकारकडून पूर्ण करण्याबाबत चाचपणी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री महोदय यांनी दिले होते. तसेच याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे वर्ग करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. यानुसार महारेलला निर्देश देण्यात आले होते.

दरम्यान महारेलने तयार केलेल्या आराखड्यानुसार हा प्रकल्प राज्य शासनाला तयार करणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे हा प्रकल्प केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून पूर्ण व्हावा असे ठरले होते.

यानुसार गेल्या पंधरवड्यात रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाला मान्यता दिली असल्याचे सांगितले जात होते. यामुळे आता या प्रकल्पाला गती मिळणार असा विश्वासही व्यक्त होत होता.

मात्र कालच्या बैठकीत अजित पवारांनी हा प्रकल्प राज्य शासन पूर्ण करणार असे सांगितले आहे. तसेच या प्रकल्पाला राज्य सरकारची मान्यता मिळाली असून राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी चे भूसंपादन पूर्ण होईल असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. यामुळे आता हा प्रकल्प राज्य सरकार पूर्ण करणार की केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून याचे काम होणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts