अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवरील नीलरत्न या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायर्नमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल जीवन प्राधिकरणाला आदेश दिले आहेत.
नारायण राणेंच्या अधीश बंगल्याच्या पाहणीचा वाद ताजा असताना नीलरत्न बंगल्यालाही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोकणात राजकीय वातावरण तापले आहे.
एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने नारायण राणेंच्या मालवण येथील नीलरत्न बंगला बांधत असताना सीआरझेड-2चे उल्लंघन झाले असल्याची तक्रार ऑगस्ट 2021ला केली होती.
दरम्यान यानंतर तक्रारीची कॉपी आपल्याला मिळाल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिली आहे. केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल जीवन प्राधिकरणला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगरपालिकेने नारायण राणे यांच्या जुहूतील अधिश बंगल्याला नोटीस बजावली होती. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बंगल्याची पाहणी आणि मोजमाप केले जाण्याची शक्यता आहे.