अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- राहाता तालुक्यातील केलवड येथे लाळ्या खुरकत घटसर्प या आजाराचा प्रादूर्भावाने 14 गायी, 6 कालवडी, व तीन शेळ्या दगावल्या आहेत. पशुपालकांचे मोठे नुकसान झाले.
या नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, यासाठी जिल्हा परिषदेकडून मदत मिळेल. शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करते.
अशा डॉक्टरला वाचविण्यासाठी वरिष्ठ प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे, असे मत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. संसर्गजन्य आजाराने दगावलेल्या गायींची घटना ही अतिशय गंभीर घटना आहे.
ही घटना केवळ पशुसंवर्धन विभागाच्या हालगर्जीपणामुळे घडली आहे. संबंधीत पशुवैद्यकीय डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्याच्या सूचना राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. अनेक गायी अजूनही बाधित आहेत.
या पार्श्वभुमिवर आमदार विखे पाटील यांनी केलवडला भेट दिली. व संबंधित शेतकर्यांच्या गोठ्याची पाहणी करून ग्रामस्थ, पशुसंवर्धन अधिकारी व संबंधित पशुपालक यांची भेट घेतली.
याप्रसंगी ग्रामस्थांनी केलवडचे पशुसंवर्धन विभागाचे डॉ. पवार यांच्या बाबतच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या. गावात अनेक ठिकाणी लसीकरण केले नाही. मात्र कागदोपत्री लसीकरण झाल्याचे दाखविले.
आमदार विखे पाटील यांनी या सर्व शेतकर्यांची गायींची लसीकरण खरेच झाले का? याबाबतची माहिती मागितली. गेल्या महिन्यापासून या संसर्गजन्य रोगाने काही गायी दगावल्या! हे घडूनही पुढे खबरदारी म्हणून लसीकरण का केले नाही?
अशा डॉक्टरवर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही व्हायला पाहिजे. असे झाल्यास सर्व महाराष्ट्रात, जिल्हाभरात पशुवैद्यकिय क्षेत्रातील अशा लोकांना चपराक बसेल, यासाठी संबंधित शेतकर्यांनी आपली लेखी तक्रार राहाता पोलीस ठाण्यात दिली पाहिजे, अशी सूचनाही आमदार विखे पाटील यांनी केली.