Raj Thackeray : देशातील ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटू या दिल्लीत महिनाभरापासून आंदोलनाला बसल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात त्यांची लैंगिक छळवणुकीची तक्रार आहे.
आता या आंदोलनाला राज ठाकरे यांनी पाठिंबा देत थेट मोदी यांनाच पत्र लिहिले आहे. लैंगिक छळवणूक प्रकरणी खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी महिला कुस्तीपटू या दिल्लीत आंदोलन करत आहेत.
या विषयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून केली आहे. आपण सहृदय आहात, याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. ही सहृदयता आपण महिला कुस्तीपटूंबाबत दाखवावी व त्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना केले आहे.
आपण प्रधानसेवक आहात, या नात्याने या विषयाकडे लक्ष द्यावे, असे लिहून राज ठाकरे पुढे म्हणतात, आपल्याला न्याय मिळावा आणि या लढाईत कोणाच्याही बाहुबलीचे दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच खात्री त्यांना सरकारकडून, म्हणजेच आपल्याकडून हवी आहे.
याआधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना, उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली असताना किंवा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर धाव घेतली होती. ही तुमची सहृदयता होती. हीच सहृदयता तुमच्या कार्यालयापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर बसलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी, अशी इच्छा जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच मनसेची देखील आहे.
जर त्यांना न्याय मिळाला नाही तर कुठल्या खेळाडूला रक्ताचे पाणी करून देशासाठी पदक मिळवावे असे वाटेल? आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुःखाची पर्वा नाही असे चित्र उभे राहिले तर ‘खेलो इंडिया’ हे स्वप्नच राहील. त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना आश्वस्त केले जाईल इतके तर आपण नक्कीच कराल, याची मला खात्री आहे, असेही राज यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.