मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. यामध्ये सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
मात्र संभाजीराजे यांना शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाची आणि राज्यसभा उमेदवारीची ऑफर (Offer) देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. संभाजीराजेंना शिवसेना राज्यसभा देत असेल तर ते शिवसेनेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
रामदास आठवले म्हणाले की, संभाजीराजेंना शिवसेना (Shivsena) राज्यसभा देत असेल, तर ते शिवसेनेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. यासोबतच भाजपनं (Bjp) त्यांना ६ वर्ष राज्यसभा दिली होती, अशी आठवणही त्यांनी करून दिली आहे.
दरम्यान, रामदास आठवले आज डोंबिवलीत संदप गावात खदानी बुडून मृत्यू झालेल्या पाच जणांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आले होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे शिवसेनेत जाण्याची शक्यता असल्याबाबत त्यांना विचारण्यात आले.
यावर बोलताना ते म्हणाले, संभाजीराजेंनी शिवसेनेमध्ये जाऊ नये. त्यांना सहा वर्ष भाजपनं राज्यसभा दिली होती, त्यामुळे त्यांनी भाजपमध्येच राहिलं पाहिजे, असा सल्लाही रामदास आठवलेंनी दिला.
तसंच त्यांना कोणत्या पक्षात जायचं असेल, तर तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यांना शिवसेना राज्यसभा देत असेल तर ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही आठवले यावेळी म्हणाले आहेत.