Ahmednagar: अहमदनगर जिल्हातील (Ahmednagar) श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात मागच्या काही दिवसापूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी (Jayashree Mali) यांनी काही स्वस्त धान्य दुकांनाची (Ration shop) तपासणी केली होती.
या तपासणीमधील सहा आणि त्यानंतर धान्य बाहेर विकण्यासाठी जाणारे धान्य पकडलेले अशा सात दुकानावर मोठी कारवाई करत त्या दुकानांचा परवाना निलंबीत व रद्द करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यात जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी सात आठ महिन्यापूर्वी काही दुकानांची तक्रारींवरुन तपासणी केली होती आणि या तपासणीनंतर काही दुकानांना अनिमियततेच्या नोटीसाही पाठवण्यात आले होते.
त्यांचे जबाब घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.सध्या श्रीगोंदा तालुक्यात सरकारी धान्याचा काळाबाजार सुरु असल्याची चर्चा जोराने होत आहे. जिल्हा पुरवठा विभागाने केलेल्या या कारवाईमुळे आता तालुक्यात काही बद्दल होते का हे पाहावे लागणार आहे.
तहसीलदार मिलींद कुलथे यांनी दिलेल्या माहितीनूसार, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात येवती, विसापुर, चिंभळे, हंगेवाडी, वांगदरी, सांगवीदुमाला व घुगलवडगाव या गावातील स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबीत व रद्दची कारवाई केली आहे.
या तपासणीत प्रामुख्याने उपलब्ध धान्य व ऑनलाईन धान्य यात तफावत आढळली आहे. त्यासोबतच भेट नोंदवही उपलब्ध नाही, शासन परिपत्रकानुसार दक्षता समिती व इतर फलक लावलेले नाही, प्राधिकारपत्र दर्शनी भागावार लावले नाही.
अन्न सुरक्षा व मानदे कायदानुसार रेशन दुकानाची नोंदणी केली नाही, वजनकाटा पासींग प्रमाणपत्र उपलब्ध नाही, परवानाधारक यांचा मुलगा वितरणाचे कामकाज करतो, परिपत्रकाप्रमाणे दरमहा सादर केलेल्या मागणीपत्रक स्थळ प्रत ठेवली नाही, योजना निहाय लाभार्थी कार्डधारकांची यादी दर्शनी भागावर लावलेली नाही, संदर्भ रजिष्टर उपलब्ध नाही अशा अनिमितता आढळ्याचे समजले. यातील काही दुकाने निलंबीत केले असून काही दुकानांचे परवाने रद्द केले आहेत.