अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी या आव्हानात्मक परिस्थितीत महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही याला जागून 13 कोटी जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
या अधिवेशनात दोन्ही सभागृहामध्ये सहा विधेयके संमत करण्यात आली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर विधीमंडळाच्या आवारात झालेल्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्याच्या सर्व स्तरातील जनतेला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. विविध उपाययोजनांच्या माध्यमातून 13 कोटी जनतेचे आयुष्य सुकर करण्यासाठी शासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी, राज्यात दुसऱ्यांदा लॉकडाऊनची वेळ येऊ नये. यासाठी सर्वांनीच कोरोना प्रतिबंधासाठी जे नियम आणि निर्बंध आहे त्याचे पालन केले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी कोरोनासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केले.
या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहात मुद्रांक शुल्काच्या दरामध्ये एकसमानता, गुंठेवारी नियमाधीन करणे व त्याची श्रेणी वाढ करणेबाबत, महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, नागरी स्थानिक संस्थामधील प्रशासकांच्या नियुक्तीच्या कालावधी वाढविणे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ विधेयक ही सहा विधेयके संमत करण्यात आली.