Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पाच महिन्यांत रेपो दरात जोरदार वाढ केली आहे. महागाईवर (inflation) नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँकेने (central bank) या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात (Repo Rate) चार वेळा वाढ केली आहे.
रिझव्र्ह बँकेने आज चौथ्यांदा रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सने वाढ केल्याची घोषणा केली. अशाप्रकारे ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबरमध्येही रेपो दर 0.50 टक्क्यांनी वाढला आहे. आरबीआयने केलेल्या या वाढीनंतर रेपो दर 5.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो दरात वाढ झाल्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. बँका त्यांना गृहकर्जापासून ते कार कर्जापर्यंत महाग करतील आणि लोकांचा ईएमआय वाढेल.
असा वाढला रेपो दर
कोरोना महामारीमुळे रेपो दरात सलग दोन वर्षे वाढ करण्यात आली नव्हती. मात्र देशात महागाईची आकडेवारी वाढू लागताच रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्यास सुरुवात केली. या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात वाढ सुरू झाली, जेव्हा आरबीआयने कोणतीही पूर्वसूचना न देता घाईघाईने एमपीसीची बैठक बोलावली आणि रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली त्यानंतर ते 4.40 टक्के झाले.
पुढील महिन्यात जूनमध्ये झालेल्या बैठकीत मध्यवर्ती बँकेने दुसरा धक्का देत रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली. त्यामुळे रेपो दर 4.90 टक्क्यांवर पोहोचला. तर ऑगस्टमध्ये आरबीआयने तिसरा धक्का देत रेपो दरात पुन्हा 0.50 टक्क्यांनी वाढ केली. त्यामुळे व्याजदर 5.40 पर्यंत वाढला. आता RBI गव्हर्नरने पुन्हा एकदा रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करून चौथा मोठा धक्का दिला आहे. मे महिन्यापासून रेपो दरात एकूण 1.90 टक्के वाढ झाली आहे.
EMI किती वाढेल?
या वाढीनंतर रेपो दराशी निगडीत कर्जे महाग होतील आणि तुमचा EMI वाढेल. रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकाही कर्जदर वाढवण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुमच्या बँकेने कर्जाच्या व्याजदरात 0.50 टक्के वाढ केली तर तुम्हाला कर्जाचा अधिक EMI भरावा लागेल.
समजा तुम्ही 8.65 व्याजदराने 20 वर्षांच्या कालावधीसाठी 20 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे. याचा अर्थ असा की तुम्ही दरमहा 8.65 टक्के दराने EMI भरत आहात. या दराने, तुम्हाला 17,547 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. आता रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढला आहे, तुमचा व्याज दर 9.15 टक्क्यांपर्यंत वाढेल आणि तुम्हाला 18,188 रुपये EMI भरावा लागेल. अशा प्रकारे तुमच्यावर दरमहा 641 रुपयांचा बोजा वाढणार आहे.
आरबीआयच्या लक्ष्य मर्यादेपेक्षा महागाई जास्त
देशातील चलनवाढीबद्दल बोलायचे झाल्यास, किरकोळ महागाई सलग आठव्या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) निर्धारित केलेल्या लक्ष्य मर्यादेपेक्षा जास्त राहिली आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या किरकोळ महागाईच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ऑगस्टमध्ये ती पुन्हा एकदा 7 टक्क्यांवर पोहोचली आहे.
याआधी जुलै महिन्यात किरकोळ महागाईत घट होऊन ती 6.71 टक्क्यांवर आली होती. त्याच वेळी, जूनमध्ये ते 7.01 टक्के, मेमध्ये 7.04 टक्के आणि एप्रिलमध्ये 7.79 टक्के होते. सरकारने महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, परंतु सर्व प्रयत्नांनंतरही महागाईचा दर याच्या वरच आहे.