७ जानेवारी २०२५ : अहिल्यानगर – महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी सोमवारी अहिल्यानगर शहरात घेतलेल्या बैठकीत सफाई कर्मचारी व नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासन , पोलीस प्रशासन ,महानगरपालिका व नगरपालिकांना अनुषंगिक उपाययोजनांच्या सूचना दिल्या.
बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, महानगरपालिका आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे, जिल्ह सह आयुक्त प्रशांत खांडेकर आदी उपस्थित होते. बैठकीत लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांना नियुक्त्या देणे, कर्मचाऱ्यांचे इतर सेवाविषयक प्रश्न आदींवर चारचाचौन सूचना देण्यात आल्या.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा आढावा घेऊन रिक्त जागा, लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार करावयाच्या नियुक्त्या, सफाई कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आदींची माहिती ॲड. लोखंडे यांनी घेतली.
सफाई कामगार व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील नागरिकांचे प्रश्न, समस्या, त्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाला दिले आहेत.