Maharashtra News :भटक्या कुत्र्यांनी माणसांवर हल्ला करण्याच्या घटना सतत घडत असतात. भारतात २०१९ पासून १.५ कोटी पेक्षा जास्त प्राण्यांच्या चाव्याच्या घटनांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र १५ लाख जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. २०१९ च्या गणनेनुसार, भारतात १ कोटी ५३ लाख ०९ हजार ३५५ भटके कुत्र्यांची नोंद करण्यात आली होती.
त्यामुळे भटकी कुत्री ही एक मोठी समस्या झाली आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यातही अनेक कायदेशीर अडचणी आहेत. त्यामुळे यासंबंधी विविध याचिका दाखल आहेत.
यातील एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान सुप्रिम कोर्टाने महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. ‘भटक्या कुत्र्यांनी माणसांवर हल्ला केला तर त्यांना अन्न देणारे जबाबदार असतील,’ असे न्यायालयाने म्हटले आहे.
केरळ आणि मुंबईत भटके कुत्रे धोकादायक बनले आहेत. यासंबंधी दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येत आहे.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी यांच्या खंडपीठाने भटक्या कुत्र्यांबाबत महत्वपूर्ण सूचना दिली आहे.
भटक्या कुत्र्यांनी माणसांवर हल्ला केला तर त्यांना अन्न देणारे जबाबदार असतील. भटक्या कुत्र्यांना नियमितपणे खायला घालणाऱ्या लोकांना श्वानांच्या लसीकरणासाठी जबाबदार धरले जाऊ शकते.
भटक्या कुत्र्यांनी लोकांवर हल्ला केल्यास या कुत्र्यांना अन्न देणाऱ्या व्यक्तींनाच उपचाराचा खर्च उचलावा लागेल, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.
सोबतच लोकांची सुरक्षा आणि प्राण्यांचे हक्क यांच्यात समतोल राखण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती खन्ना म्हणाले, आपल्यापैकी बहुतेकजण श्वानप्रेमी आहेत. मी कुत्र्यांना अन्न देतो. पण माणसांनी श्वानांची काळजी घेतली पाहिजे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तर्कशुद्ध तोडगा काढला पाहिजे, असेही न्यायमूर्ती खन्ना म्हणाले.