Rolls Royce Accident : चालकांच्या चुकीमुळे सध्या अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात वाहतुकीचे नियम कडक केले आहेत. तरीही दररोज अपघातात अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. परंतु यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.
सध्या असाच एक भीषण अपघात हरियाणाच्या नूह येथे दिल्ली-मुंबई-बडोदा द्रुतगती मार्गावर झाला आहे. या महामार्गावर तेल ट्रक आणि एका रोल्स-रॉयस कारची जोरदार धडक झाली आहे. या भीषण अपघातात एका तेल टँकर चालक आणि त्याच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर कारमधील तीन प्रवासी जखमी झाले आहेत.
या भीषण अपघातातील जखमींवर गुडगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माहितीनुसार, टँकर चालक रामप्रीत आणि त्याचा सहाय्यक कुलदीप हे दोघेजण ठार झाले आहेत.टँकरला धडकल्यानंतर रोल्स रॉयस कारने लगेचच पेट घेतला. परंतु दुसऱ्या कारमध्ये असणाऱ्या लोकांनी रोल्स रॉयसमधील प्रवाशांना वेळीच बाहेर काढले. त्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला आहे.
नूह पोलिसांचे सहाय्यक उपनिरीक्षक अशोक कुमार यांनी याबाबत सांगितले की, संबंधित ट्रक राँग साईडने जात होता. तो नगीना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी गावाजवळ रोल्स रॉयस या कारला धडकला. हा अपघात इतका भयानक होता की यामध्ये ट्रक चालक आणि त्याचा सहाय्यकाचा जागीच मृत्यू झाला. या भयानक अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव कार्य सुरु केले. जखमींचा जबाब घेऊन तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मृत झालेले दोघेही उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोल्स रॉयसमध्ये स्वार तीन जखमींमध्ये चंदीगड येथील दिव्या आणि तस्बीरचा, तर दिल्ली या ठिकाणचा रहिवासी आहे. सध्या त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.