ताज्या बातम्या

सदभावना सायकल यात्रा आता छायाचित्र रूपात… पाच राज्यांसह बांगलादेशातील प्रवासाचे दर्शन

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- स्नेहालय आयोजित भारत-बांगलादेश सदभावना सायकल यात्रेवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन रविवारी अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे विश्वस्त अॅड. मेहेरनाथ कलचुरी,सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, निवृत्त सनदी अधिकारी नितीन थाडे आदींच्या उपस्थितीत झाले.(Bangladesh Darshan) 

भारताच्या स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव, १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात मिळवलेल्या विजयाचा सुवर्ण महोत्सव आणि बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधु यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून २ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबरदरम्यान ही सायकल यात्रा काढण्यात आली.

महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, बंगाल या राज्यांतून प्रवास करत ही यात्रा बांगलादेशातील नौखाली येथे पोहोचली. ५५ दिवसांत ४२८० किलोमीटरचा प्रवास करून नौखालीतील महात्मा गांधी आश्रमात या यात्रेची सांगता झाली. या यात्रेदरम्यान सुमारे १०० गावांना भेट देऊन चेंजमेकर ठरलेल्या ५०० सामाजिक कार्यकर्त्यांशी यात्रीनी संवाद साधला.

त्यांच्या कामाची, संस्थेची माहिती घेतली. शंभरांहून अधिक व्यक्ती आणि विद्यार्थी या यात्रेत सहभागी झाले होते. अनोखी अनुभूती देणारा हा प्रवास आता छायाचित्रांच्या रूपाने संग्रहित करण्यात आला आहे. ही छायाचित्रे भूषण देशमुख ,संदीप क्षीरसागर, अजय वाबळे, यांनी काढली आहेत.

चित्रकार योगेश हराळे यांच्या संकल्पनेतून या प्रदर्शनाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रदर्शनाचे उदघाटन हरीश बुटले, नरेंद्र वडगावकर, गोरक्षनाथ वेताळ, दिल्ली येथील धमेंद्र कुमार, हनुमंत देसाई आदींच्या उपस्थितीत झाले. दिवंगत भाईजी डाॅ. एस. एन. सुब्बराव, विशाल अहिरे व अल्बर्ट कुरीस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

हिम्मतग्राममध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या स्मृतीवनात या तिघांचे अस्थी आणि रक्षा कलशांवर स्मृती प्रेरणा स्तंभ उभारण्यात आले आहेत . प्रारंभी स्नेहालयातील साक्षी, दिव्या आणि परी या विद्यार्थिनींनी बहुभाषिक प्रेरणा गीते सादर केली. भारत व बांगलादेशच्या राष्ट्रगीताने लोकार्पण सोहळ्याचा समारोप झाला.

राजीव गुजर यांनी प्रास्ताविक केले, तर वैजनाथ लोहार यांनी आभार मानले. हे प्रदर्शन इसळक (ता. नगर) येथील वैष्णोमाता मंदिराजवळील स्नेहालयाच्या

स्नेहस्पर्श पुनवर्सन प्रकल्पातीलविशाल सेंटरयेथे आयोजित करण्यात आले. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत ते सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. अधिक माहितीसाठी चंद्रकांत शेमडे ९८३४६८४३६०, श्याम चव्हाण – ९३७०८७३८७९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts