अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे; मात्र त्यांनी आंदोलनात चालढकलपणा करू नये.
मराठा समाजासमोर त्यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट करावी, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मांडले. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटन समारंभावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठीच्या प्रत्येक लढ्याला भाजपाचा पाठिंबा आहे. ज्या दिवशी रायगडावरून संभाजीराजेंनी मोर्चाची घोषणा केली, त्याचा दुसऱ्या मिनिटाला मी संभाजीराजेंना पाठिंबा जाहीर केला.
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या आंदोलनात कोणताही बॅनर न घेता उभे राहतील, असे सांगितले. आता ते म्हणत असतील की, मी मोर्चाचे कधी म्हणालो होतो? तर तो त्यांचा प्रश्न. म्हणून आम्ही मोर्चा काढणार नाही; पण कोल्हापुरातून मोर्चासाठी कोणी पुढे येणार असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.
मराठा समाज सुज्ञ आहे. आंदोलनातील चालढकलपणा त्यांना त्वरित लक्षात येतो. संभाजीराजेंनी १६ जून रोजी मोर्चाची घोषणा केली. आता लोकप्रतिनीधींना जाब विचारायचे ते म्हणत आहेत.
याबाबत मराठा समाजाला स्पष्टता हवी. कोरोनाबाबत चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, देशातील एकूण मृत्यूच्या ३३ टक्के मृत्यू राज्यात झाले. राज्य सरकारने कोविडकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. कोविडसाठी राज्य सरकारने जे केले, त्याची श्वेतपत्रिका काढावी