अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- शिवसेना नेते संजय राऊत म्हणजे सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमधील तिवारीच्या पात्राप्रमाणे आहेत. त्यांना ‘अहं ब्रह्मास्मि’चा भास होतो, ते त्याच थाटात वावरत असतात,
असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निदान मुंबईत तरी पाहणी करण्यासाठी बाहेर पडावे, अशी टीकाही देशपांडे यांनी केली.
ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्यावर खोचक टिप्पणी करणाऱ्या शिवसेनेचा समाचार घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वत:च्या राज्यावर प्रेमही आहे. पण आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातही यावे. म्हणजे ते भारताचे पंतप्रधान आहेत, असे वाटेल. पंतप्रधान येऊन गेले तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्रात फिरतील, असे देशपांडे यांनी म्हटले.