मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदीवरील भोंग्याचे वक्तव्य महाराष्ट्रात (Maharashtra) चांगलेच हिंदुत्वाचे राजकारण तापवत आहे. राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे.
त्यापूर्वी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरे यांच्या निशाणा साधला आहे. ज्यांनी हिंदुत्वाचे (Hindutwa) कातडे पांघरले आहे, हे कातडेही भाड्याचे आहे अशी खोचक टीका संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
संजय राऊत यांनी बोलताना भाजपला (BJP) देखील टोला लगावला आहे. ते म्हणाले, 1992ची दंगल विसरलात का, ज्यामध्ये शिवसैनिकांनी बलिदान केले.
अयोध्येच्या आंदोलनात शिवसेनेने केलेला त्याग ते विसरले का, आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावे लागत नाही, ते आमच्या रक्तात आहे. आम्ही कोणालाही वापरू देत नाही.
आमचा वापर होत आहे, असे वाटते त्यावेळी लाथ मारून स्वाभिमानाने बाहेर पडणारे शिवसैनिक आहोत. हिंदुत्वाचा अपमान होत आहे, हे लक्षात आल्यावर शिवसेना युतीतून बाहेर पडली. त्यामुळे आम्हाला कोणीही हिंदुत्व शिकवू नये, तुम्ही अडचणीत याल असेही राऊत म्हणाले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, कुणाच्या वाढदिवसाला आपण भैया नावाचा केक कापला, हे जरा आठवावे. ज्या राज्यात चालला आहात, त्या राज्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ या नेत्याविषयी आपल्याच नेत्याची वक्तव्ये पाहा. तोंड उघडायला भाग पाडू नका.
ज्यांनी योगींना टकला म्हणून हिणवले, त्यांच्या भगव्या कपड्यांवरून नावे ठेवली त्यांनी शिकवू नये. अचानक हिंदुत्ववादी झाले असे म्हणत संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावला आहे.
आम्ही दुसऱ्याच्या खांद्यावरून बंदुक चालवत नाहीत. आमची शस्त्रे आहेत. ही शस्त्रे धारदार आहेत. हनुमान चालिसाच्या नावावर दंगली घडवून देशाचे विभाजन करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.
अश्विनीकुमार चौबे यांनी आपले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांचे हनुमानाविषयीचे वक्तव्य आठवावे, त्यांनी शिवसेनेची, बाळासाहेब ठाकरेंची चिंता करू नये. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी काय गद्दारी केली,
हे बाळासाहेब ठाकरेंनाही पटले नसते, अशी आठवण त्यांनी करून दिली. हनुमान चालिसावरून राजकारण करून महाराष्ट्राला बदनाम करू नका असेही संजय राऊत अश्विनीकुमार चौबे यांना म्हणाले.