Maharashtra News :‘लम्पी’ या चर्म रोगाचे संक्रमण मोठ्या प्रमणावर वाढते आहे. हा रोग जनावरांसाठी अतिशय जीवघेणा ठरतो आहे परंतु या गंभीर प्रश्नाकडे प्रशासकीय दुर्लक्ष आहे.
यासंबंधी योग्य त्या उपाययोजना करून गायींचा जीव वाचविण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी तसेच अहमदनगरचे सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख, खडकाळ माळांवर जंगल फुलवणारे सांगली जिल्ह्यातील शेतकरी संपतराव पवार आणि मलकापूर तालुक्यातील भालेगावचे युवा सरपंच तेजस घुले पाटील यांनी संयुक्तपणे ही याचिका दाखल केली आहे.
पुण्यातील विधीज्ञ अॅड. असीम सरोदे, अॅड. तृणाल टोणपे, अॅड. अजित देशपांडे, अॅड. अजिंक्य उडाणे, अॅड. अक्षय देसाई यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पशूंच्या संदर्भात असणाऱ्या ‘लम्पी’आजाराची संक्रमकता अतिशय वेगवान असून या रोगामुळे मोठया प्रमाणात गायी, म्हशी आणि दुध देणारी जनावरे मरत आहेत.
यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान होते आहे.शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. या आजाराची भयानकता खूप असून देखील त्याकडे सरकारने नीट लक्ष दिलेले नाही व बेजाबदार पद्धतीने केवळ घोषणा केल्या जात असल्याचे निरीक्षण याचिकेतून मांडण्यात आलेले आहे.