मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असून सरकारबद्दल राष्ट्रवादीचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढील आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी सत्ता कायम राखणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
सध्या शरद पवार जिल्हा दौऱ्यावर असून माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, पहिल्यांदाच देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्यात केंद्राचा इंधनावरील कर सर्वाधिक असून तो कमी करण्याची गरज आहे.
अत्यावश्यक वस्तूंच्या किमती, महागाई वेळीच रोखली नाही तर त्याचे परिणाम वेगळे असतील. तसेच भाजपचे (Bjp) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), नारायण राणे हे सरकार पाडण्याच्या तारखांवर तारखा देतात. ते आम्ही एन्जॉय करतो, अशी टिप्पणीही पवार यांनी केली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे तर पूर्ण करेलच; परंतु, पुढील पाच वर्षे सत्तेत राहील, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने आगामी निवडणुका एकत्र लढायच्या की वेगवेगळ्या, या अनुषंगाने पंधरा दिवसांत निर्णय होईल. वेगवेगळे लढून नंतर एकत्र येणे अथवा एकत्रित मिळून लढणे. त्यावर प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील, असेही शरद पवार म्हणाले आहेत.