Shinde Government : राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख फिक्स झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढील आठवड्यात शिंदे सरकारच्या (Shinde Government) मंत्रिमंडळाचा (Cabinet) विस्तार होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार 26 किंवा 27 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकते. यामध्ये तीस पेक्षा अधिक नेत्यांचा शपथविधी होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil
) यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.यापूर्वी दोन टप्प्यात हा विस्तार होणार होता मात्र आता एकच टप्यात हा शपथविधी पार पडणार असून एकाचवेळी सुमारे 30 जणांचे मंत्रिमंडळ जाहीर करण्यात येणार आहे. या मंत्रिमंडळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, तर शिंदे गटातील उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश असणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 शिवसेना आणि 10 अपक्ष अशा 50 आमदारांचं पाठबळ आहे. चौघांच्या मागे एक, या सूत्रानुसार शिंदे गटाला एकूण 13 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद अशी एकूण संख्या आहे.
शिंदे गटात असणाऱ्या पाच जणांकडे ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदं होती. एकनाथ शिंदे वगळता चार जणांसोबत आणखी एकाला सुरुवातीलाच मंत्रिपदाची शपथ मिळण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्तार रखडला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होऊन पंधरा दिवस झाले. अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या आठवड्यात हा विस्तार होणार असल्याची चर्चा होती. पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि इतर काही कारणामुळे तो विस्तार रखडला. या आठवड्यातही हा विस्तार होण्याची शक्यता कमी असल्याचे समजते.