अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 8 मार्च रोजी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला.
यावेळी अजित पवारांनी बजेटमध्ये स्पष्ट केलं की, मद्यावरील मूल्यवर्धित करामध्ये 5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात कोरोना संकटामुळे राज्याचा उत्पन्नात बरीच घट झाली आहे.
त्यामुळे आता राज्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडतांना देशी तसेच ब्रॅण्डेड मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर २२० टक्के अथवा
प्रत्येक प्रुफ लिटरच्या मागे १८७ रुपये या पैकी ज्याचे दर जास्त असतील ते लावण्याचा प्रस्तावित केले होते. तसेच, दारुवरील मूल्यवर्धित कर कायद्याच्या अनुसूची ‘ख’ नुसार ६० टक्के मूल्यवर्धित करामध्ये वाढ करून त्याला आता ६५ टक्के करण्यात आले आहे.
मूल्यवर्धित कर कायद्याच्या कलम ४१ (५) नुसार मद्यावर ३५ टक्क्यावरून ४० टक्के करण्यात आले आहे. यामुळे विदेशी दारूच्या दरामध्ये ७ ते १० रुपयांनी वाढ होण्यार आहे. राज्यात यामुळे आता दारुचे दर वाढणार आहेत.
यामुळे मद्यप्रेमींना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.दरम्यान, दारुवर आकारण्यात येणाऱ्या करामुळे राज्याच्या तिजोरीत 800 ते 1000 कोटींहून अधिकच्या महसुलाची भर पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तर, तज्ञांच्या मते महिलांसाठी खास मुद्रांक शुल्कात सवलत दिल्याने तिथे सरकारच्या तिजोरीतून १ हजार कोटींची कपात होण्याची शक्यता असल्याने, ती भरून काढण्यासाठी उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आल्याचे मत व्यक्त केले आहे.