अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावर आंबी खालसा फाटा येथे पोलीस वाहनांची तपासणी पोलीस करत होते.
त्यावेळी नाशिकहून पुण्याकडे कार घेऊन चाललेल्या चालकाने पोलीस निरीक्षकाच्या अंगावर कार घातली. यात सुदैवाने ते बचावले. मात्र, पायावरून कारचे चाक गेल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान या दुर्घटनेत सुनील पाटील (पोलीस निरीक्षक) हे जखमी झालेले आहे.
त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, संचारबंदीमध्ये नाशिक-पुणे महामार्गावर आंबी-खालसा शिवारात घारगाव पोलिसांकडून नेहमीप्रमाणे शनिवारीही नाकाबंदी करण्यात आली होती.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास नाशिककडून आलेली कार (एम.एच १२, आर. वाय. ८५६८) पुण्याकडे जात होती. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी चालकाला कार थांबविण्याचा इशारा केला.
मात्र, चालकाने थेट पाटील यांच्या अंगावर कार घातली. यात पाटील यांच्या डाव्या पायाच्या पंज्यावरून कारचे चाक गेले. त्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पोलिसांना कार व चालकाला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.