बँकेमध्ये होणारे घोटाळे आता काही नवीन राहिलेले नाहीत. पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेत पैसे ठेवले जातात. परंतु अलीकडील काळात फसवणुकीचे किंवा बँकेतील घोटाळ्यांचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आता अहमदनगर मधून स्टेट बँकेत घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या बँकेच्या नागापूर शाखेतील खात्यातून एका उद्योजकाचे बेकायदेशीररीत्या १५ लाख रुपये काढून घेतले आहेत. आता संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्या उद्योजकाने निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना केली आहे. शेवगाव येथील श्रवण ऑईल मिलचे श्रेणिक राजेंद्र भंडारी असे या फसवणूक झालेल्या उद्योजकांचे नाव आहे.
निवेदनात नेमकं काय म्हटलंय ?
स्टेट बँकेची नागापूर – औद्योगिक वसाहतीत एक शाखा आहे. तेथे भंडारी यांचे बँक खाते आहे. ते यातील रक्कम व्यवसायासाठी वापरत असतात. एप्रिल २०२२ मध्ये या खात्यावर केवळ ९ हजार ४३३ रुपये होते. असे असूनही या खात्यावर परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावे १५ लाखांचा धनादेश भरण्यात आलाय धक्कादायक म्हणजे हा धनादेश बँकेच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररीत्या पासही केला असून, त्याची अपहार केलाय असं निवेदनात म्हटलंय.
त्यामुळे आता खात्यात पैसे नसतानाही १५ लाखांचा धनादेश कसाकाय वटला गेला, याची चौकशी करून कारवाई करावी असे म्हटले आहे. तसेच संबंधित व्यक्तीला फोन केला असता त्याने मला याबाबत काहीही माहिती नसून हे सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांनी केले असे तो म्हटलाय.
बँकेच्या अधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती
संबंधित व्यक्तीच्या बैंक खात्यात त्यावेळी १५ लाख रुपये आलेले होते. त्यामुळे त्यांचा १५ लाखांचा धनादेश वटविण्यात आला असल्याची स्पष्टोक्ती प्रफुल्ल वाघमारे, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक, नागापूर एमआयडीसी शाखा यांनी दिली आहे.