नवी दिल्ली : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची (Sidhu Moosewala) हत्या झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक मंत्री तसेच नेते मंडळी मुसेवाला यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेत आहेत.
आज काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधीही (Rahul Gandhi) पंजाबमधील मानसाच्या मुसा (Musa) गावाला भेट देणार आहेत. राहुल गांधी येथे दिवंगत गायक आणि पक्षाचे नेते सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
मुसेवाला हे काँग्रेसचे नेतेही होते हे विशेष. यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर मानसा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
तत्पूर्वी, नेते मुसेवाला यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचतात. पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह अनेक नेत्यांनी सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.
सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह (Balkaur Singh) यांनी शुक्रवारी चंदीगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी न्याय आणि दोषींवर कारवाईची मागणी केली होती.
सोमवारी, राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट आणि हरियाणा आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. अशोक तंवर यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह मूसेवाला यांच्या निवासस्थानी पोहोचून मूसेवाला यांच्या हत्येचा निषेध केला आणि शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन केले.
२९ मे रोजी मानसा येथे सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मूसवाला यांच्या हत्येनंतर पंजाबमध्ये राजकारण तापले आहे. मूसवाला हत्याकांडातील ८ फरार शूटर्सची ओळख पटली आहे, ज्यांच्या अटकेसाठी अनेक राज्यांचे पोलीस गुंतले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सध्या पंजाब पोलिसांची एसआयटी मूसवाला हत्या प्रकरणाचा तपास करत आहे.