गोदावरी कालव्याला खरीपाचे आवर्तन सोडवा

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  दोन महिन्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिके कोमेजून गेली आहेत. पाणी मिळाले तरच ही पिके जगतील. पाण्याच्या चालू आवर्तनातून खरीपाच्या पिकांना पाणी देणे गरजेचे होते.

मात्र अचानक पाटबंधारे विभागाने कालवा बंद करत शेतकऱ्यांवर अन्याय केला. पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. गोदावरीच्या कालव्यांना तातडीने खरिपाचे आवर्तन सोडा, अशी मागणी शिवसेना नेते नितीन औताडे यांनी केली आहे. पाणलोट क्षेत्रात घोटी इगतपुरी त्र्यंबकेश्वर भागात पर्जन्यमान चांगले झाल्याने गोदावरी नदीला वाहत आहे.

दारणा गंगापूर धरणे ७५ टक्के भरलेली आहेत. कोपरगाव राहाता तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतो. त्यामुळे ब्रिटिशांनी या भागाला पाणी मिळण्यासाठी या धरणांची निर्मिती करून गोदावरी कालव्याद्वारे पाणी आणले.

२००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा झाला आणि नगर नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी मराठवाड्याकडे वर्ग करण्यात आले. धरणातील पाण्याचा गोदावरीला विसर्ग होतो. शेतकऱ्याने पदरमोड करत, दागिने गहाण ठेवत, कर्ज काढून खरिपाची पिके घेतले आहे.

सोयाबीन, मका, कपाशी, भाजीपाला फळबागा पाऊस नसल्याने पाण्याअभावी जळून चालल्या आहेत. सातत्याने शेतकऱ्यांच्या वतीने गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे. गोदावरी कालव्याला अवघ्या दिड टीमसी पाण्याची गरज आहे, असेही औताडे यांनी म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24