अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-थकीत विज बिलांच्या वसुलीसाठी महावितरण कडून विजपुरवठा खंडीत करण्यात येत असून त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
त्याविरोधात दाद मागण्यासाठी मनसे, शेतकरी संघटना, आजी माजी सैनिक संघटना आक्रमक झाल्या असून सोमवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ,
उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे मनसेचे अविनाश पवार यांनी सांगितले.
नगर पुणे महामार्गावर सकाळी ११ वाजता आंदोलनास प्रारंभ करण्यात येईल. प्रारंभी मंत्र्यांचे पुतळे जाळून निषेध व्यक्त करण्यात येणार असून विजपुरवठा सुरळीत होईपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील कृषी पंपांच्या विजबिलांची थकबाकी मोठया प्रमाणावर वाढली असून वसुली अभावी महावितरणचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
त्यावर उपाययोजना म्हणून राज्याबरोबरच तालुक्यातील थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. विजबिलांच्या वसुलीसाठी विजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे.
सध्या शेतकऱ्यांची पिके बहारात असून विजपुरवठा खंडीत झाल्याने पाण्याअभावी ती जळू लागली आहेत. गेल्या काही वर्षात यंदा प्रथमच चांगले पर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांनी विविध पिके घेतलेली आहेत.
बहारात आलेली पिके डोळयादेखत जळू लागल्याने शेतकरी वार्गात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे विजपुरवठा खंडीत न करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
सुपे परिसरातील नागरीकांनी आवाज उठवूनही विजपुरवठा सुरळीत न झाल्याने आक्रमक होत मनसे, शेतकरी संघटना तसेच आजी माजी संघटनांनी रास्ता रोको तसेच
मंत्रयांचे पुतळे जाळून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी हे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत