अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Sugarcane Crushing :- गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) आता अंतिम टप्प्यात आहे मात्र तरीदेखील राज्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा (Sugarcane Producer) ऊस फडातच उभा आहे.
सध्या सर्वत्र अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आहे. वेळेवर उसाची तोड होत नसल्याने उसाचे वजन कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना (Sugarcane Growers) फटका बसणार आहे. सर्वत्र ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस तुटावा म्हणून धावपळ करत आहे.
शेतकऱ्यांच्या या अडचणीचा फायदा ऊसतोड मजुरांकडून उचलला जात असल्याच्या तक्रारी आता समोर येऊ लागल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की ऊस तोड कामगार ऊस तोडण्यासाठी प्रति एकरी 10 ते 12 हजार रुपयांची मागणी करत आहेत. शिवाय ऊस तोड कामगार (Sugarcane workers) जेवणाला मटण, गाडी भाडे अशा इत्यादीची मागणी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हीच परिस्थिती लक्षात घेता कमलाभवानी साखर कारखान्याने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऊसतोड कामगार यांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये तसेच वेळेत ऊस तोडावा यासाठी कारखान्याने 1 एप्रिल पासून ऊस तोडणी करणाऱ्या ट्रक/ट्रॅक्टर टोळ्या, टायर बैलगाडीवर ट्रॅक्टर गाडी मजूरांना यांना टनामागे पन्नास रुपये अधिक देण्याचा निर्णय घेतला आहे.
तोडणी रक्कम वाढवल्याने ऊसतोड वेळेत होईल असा कारखान्याचा विश्वास आहे. याबाबत कारखान्याचे संस्थापक चेअरमन विक्रम सिंग यांनी माहिती दिली.
संस्थापक चेअरमन विक्रम सिंग यांनी सांगितले की, यावर्षीचा गाळप हंगाम एप्रिल अखेरपर्यंत चालणार आहे. सध्या गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस गाळप होणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी कारखाना प्रयत्नरत आहे.
सध्या उन्हाच्या तीव्रतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे यामुळे ऊसतोड कामगारांची कामाची क्षमता देखील कमी होऊ लागली आहे. यामुळे ऊसतोड कामगारांना प्रोत्साहित करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. सध्या सुरू असलेले शेतकऱ्यांची तारेवरची कसरत पाहता कारखाना पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना आता वाढीव रक्कम दिली जात आहे. निश्चितच यामुळे ऊस तोडणी करणाऱ्या कामगारांकडून होत असलेली शेतकऱ्यांची पिळवणूक थांबेल असा आशावाद यावेळेस कारखान्याकडून व्यक्त केला गेला आहे.