अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- कोल्हार भगवतीपूर परिसरात नगर-मनमाड या राज्य मार्गावर असलेल्या रेणुका टायर्स या दुकानाची तोडफोड करून सुमारे चार लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.
या गोष्टीला महिना उलटून देखील अद्यापही चोरट्यांचा तपास न लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चोरट्यांचा तपास लागावा म्हणून लोणी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले होते.
कोल्हार भगवतीपूर परिसरात झालेल्या चोरीचा कुठल्याच गुन्ह्याचा अद्यापही तपास न लागल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. गुन्हेगारांना तातडीने पकडण्यात यावे, चोरट्यांचा तपास न लागल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा कोल्हार भगवतीपूर येथील व्यापारी असोसिएशनच्या वतीने देण्यात आला.
कोल्हार परिसरात दुचाक्या, घरफोड्या, अशा अनेक घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत. अद्यापही या घटनेचा तपास लागला नाही. पोलिसांचा चोरावरचा वचक राहिलेला नसल्याचे देखील बोलले जात आहे.
कोल्हार भगवतीपूर परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून या गुन्हेगारांना पकडून तातडीने गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा घालण्यात यावा, असे निवेदन राज्याचे माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले.