तहसीलदार देवरे यांच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- तहसीलदार ज्योती देवरे यांनी अधिकार नसतानाही तालुक्यातील वर्ग-१ च्या गावांमधील जमिनींच्या ७१ प्रकरणांमध्ये बिगरशेती (अकृषिक) आदेश पारित केले.

जप्त केलेल्या वाळूसाठ्याचा नियमाप्रमाणे लिलाव करून लिलावाची रक्कम सरकारी खजिन्यात जमा केली नाही, असे विविध ठपके ठेवत तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करावी, अशी विनंती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नाशिक विभागीय आयुक्तांना पंधरा दिवसांपूर्वी ६ ऑगस्ट रोजी पत्र पाठवून केली.

त्यामुळे तहसीलदार देवरे यांच्या गाजलेल्या ध्वनिफीत प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, आमदार नीलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप करत त्रासाला कंटाळून आपण आत्महत्येच्या विचारापर्यंत आलो असल्याचे जाहीर करणारी तहसीलदार देवरे यांची ध्वनिफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर फिरली.

या ध्वनिफितीने राज्यात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर गैरव्यवहाराच्या चौकशीत दोषी आढळल्याने सहानुभूती मिळवण्यासाठी तहसीलदार देवरे बिनबुडाचे आरोप करत असल्याची प्रतिक्रिया आमदार लंके यांनी दिली.

विशेष भूसंपादन अधिकारी जयश्री आव्हाड यांनी अरुण आंधळे व निवृत्ती कासोटे यांनी तक्रारीत उपस्थित केलेल्या ३० मुद्द्यांच्या आधारे तहसीलदार देवरे यांनी पारित केलेल्या आदेशांची चौकशी केली.

या चौकशीच्या आधारे तयार करण्यात आलेला २७५ पानांचा अहवाल आव्हाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. या अहवालाच्या आधारे तहसीलदार देवरे यांच्यावर कारवाई करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts