अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :-नाशिकचे माजी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंग्यांसंबंधी काढलेला आदेश नवे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी रद्द केला आहे.
नाशिक शहरात स्वतंत्र आदेशाची गरज दिसत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल, असे म्हणत नाईकनवरे यांनी जुना आदेश रद्द केला आहे.
बदली होण्याआधी १७ एप्रिल रोजी पांडेय यांनी हा आदेश काढला होता. त्यानुसार ३ मेपर्यंत भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागेल.
आजान सुरू असताना आणि संपल्यानंतर काही काळ मशिदीच्या शंभर मीटर परिसरात हुनुमान चालीसा लावण्यासही बंदी घालण्यात आली होती.
भोंगे लावण्याच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंगवास किंवा थेट हद्दपार करण्याचा इशाराही आदेशात होता.
याचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्यानंतर राज्यस्तरावर नियमावली तयार करण्याचा विचार सुरू झाला. त्यासाठी सर्वपक्षीय बैठक झाली. मात्र, यासंबंधी केंद्र सरकारने नियम करावेत, असे सांगून राज्याने केंद्राकडे बोट दाखविले. त्यानंतर नाशिकमधील हा आदेशही मागे घेण्यात आला आहे.