अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या बाळ बोठे याला हैदराबाद येथून पोलिसांनी अटक केली. त्याची रवानगी सध्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबत त्याच्याकडून माहिती संकलन करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान या हत्याकांडाबाबत माहिती देण्यास त्याने सुरुवात केली आहे. यामुळे या प्रकरणाचा लवकरच खुलासा होणार आहे, असे दिसते आहे.
सध्या बोठे पोलीस कोठडीत असून वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याच्याकडे चौकशी करत आहेत. सुरूवातीला बोठे याने चौकशीत प्रतिसाद दिला नसल्याची बाब समोर आली होती.
परंतु, आता बोठे याने मौन सोडले असून घटनेचा उलगडा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनेच्या अनुषंगाने बोठेचा ज्याठिकाणी संबंध आला त्या स्थळांवर पोलिसांनी त्याला गुरूवारी फिरवले.
बोठे राहत असलेल्या घरी व त्या परिसरात, तो पूर्वी काम करत असलेल्या वर्तमानपत्राच्या कार्यालय आदी ठिकाणी स्थळपाहणी केली. त्याठिकाणचा पंचनामा करण्यात आला.
दरम्यान रेखा जरे यांची हत्या कोणत्या कारणातून केली, यासह अन्य गोष्टी पोलीस तपासात समोर येत आहे. पोलिसांनी त्याविषयी गोपनियता बाळगली आहे. बोठेने हत्येविषयी मौन सोडल्याने तपासात गती आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.