Educational News :- कोरोनामुळे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीतही काही दिवस सुरू ठेवण्याचा विचार सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत आज यावर चर्चा झाली.
यासंबंधी आलेल्या मागणीवर अधिकाऱ्यांनी विचार करून कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती प्रताप शेळके यांनी केली.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याशिवाय उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला अगर सहलीला जाणेही अवघड झाले आहे. यावर्षी कोरोनाचा प्रभाव ओसरल्याने शाळा ऑफलाइन आणि पूर्णवेळ सुरू झाल्या आहेत.
एका बाजूला यावर्षी तरी सहलीला आणि मामाच्या गावाला जायला मिळणार या खुशीत विद्यार्थी असताना कोरोना काळात झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सुट्टीत काही काळ शाळा सुरू ठेवण्याचा प्रस्ताव आला आहे. आता त्यावर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.