अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातच नागरिकांना वारंवार आवाहन करून देखील लोक जबाबदारीने वागायला तयार नाही आहे. म्हणून जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढू लागली आहे.
यातच कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील काही व्यावसायिकांची कोरोना तपासणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
यामुळे आता व्यवसायिकांसह दुकानदारांनी देखील नागरिकांच्या संपर्कात येण्यापूर्वी काळजी घेणे महत्वाचे बनले आहे.
नुकतेच श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत येथील प्रत्येक दुकानदार, व्यावसायिक यांची करोना रॅपिड टेस्ट करण्यात आली. यावेळी जवळपास 42 जणांची तपासणी करण्यात येवून त्यात 5 जण बाधित आढळले.
याप्रसंगी तहसीलदार प्रशांत पाटील म्हणाले, आपल्या कुंटूबाची व आपल्यासह गावाच्या आरोग्याची काळजी आपणच घेण्याची गरज आहे.
तसेच तालुक्यातील प्रत्येक गावाने व्यापारी वर्ग, व्यावसायिक यांची तपासणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले.